Sunday, September 28, 2008

रात्रीतून शिल्लक उरलेला दिमित्री

माझी नेहमीची दाराच्या लाइनीतली डाव्या हाताच्या कोपर्‌यातली खिडकी. तिथे बसणं सेफ़ असतं. कारण आपण सगळ्यांना बघू शकतो पण आपल्याला सगळे बघू शकत नाहीत.

माझ्यासारखेच नेहमी तिथे येणारे पप्पा. ते पंच्याहत्तरीकडे झुकलेले आणि केस पांढरेधुप्प झालेले. गाल किंचित ओघळलेले, पोटपण वयानुसार वाढत गेलेलं. हातात काठी, डोळ्यांना जाड काळ्या फ़्रेमचा चष्मा. चालतांना दोन पायांत अंतर ठेवून काठीवर भार टाकत चालायची सवय. त्यांना सगळे पप्पाच म्हणतात. ते रोज सकाळी साधारण सव्वासातला तिथे येतात, काउंटरवर गप्पा झोडतात, आणि मग तिथलाच पेपर उचलून शेवटच्या टेबलवर चालू पडतात. मग गंभीर चेह्र्‍यानी त्यांचं पेपर वाचन सुरू होतं. त्यानंतर त्यांच्या चेह्‍यावरचा तो भाव पेपर संपेपर्यंत कायम राहतो. त्यांचा रंग गोरा, नाक टोकदार अणि चेह्‍र्य़ात गोडवा. यंग असतांना नक्कीच छान दिसत असणार. एनिवेज, त्यांचं वाचन सुरू झाला की माझं लक्षं दुसरीकडे जातं. दुसरा कोणताच मेंबर त्यांच्या किंवा माझ्याइतका कंसिस्टंट नाही (म्हणजे असं मला तरी वाटतं).

२७ जूनला मी अशीच सकाळी आवरुन साडेसातच्या सुमारास बाहेर पडले. नेहमीप्रमाणे बागेत चक्कर मारून चहा प्यायला इकडे वळले. माझ्या ठरलेल्या जागी बसावं म्हंटलं तर तिथे तो बसलेला. पुढ्यात एक चहा, ब्रेड ठेवलेली बशी, एक रजिस्टर, पुस्तक, सिगारेटचं पाकीट, काडीपेटी, आणि पाऊच. खुर्चीला एक लांब छत्री अडकवलेली होती. तो उजव्या हाताच्या पहिल्या दोन बोटांत सिगारेट धरुन उरलेल्या बोटांनी कपाळ चोळत होता. (साईन ऑफ़ विचारमग्नता). मला उगाचच राग आला. खरंतर मी काही ती सीट रिझर्व केली नव्हती. मग त्याच लाईनीत एक टेबल सोडून बसले. आज उपमा खावासा वाटला. त्यामुळे उपमा आणि चहा मागवला. माझं सध्या चालू असलेलं पुस्तक उघडलं. गौरीचं "दुस्तर हा घाट". खरंतर ते रात्रीच वाचून संपलं होतं. पण दिमित्री, इयन, कालिंदी आणि नंदनही अजून सोबत होते. चहा पितांना वाफ़ एकदम चेहर्‍यावर आली आणि मी डोकं किंचित मागे करुन झटक्यात मागे वळवलं. आणि मला एकदम दचकायला झालं. म्हणजे एकदम गार पाण्याच्या खाली पहिल्यांदा गेल्यावर होतं तसं. मला तो दिसला आणि मी मनात एकदम दिमित्री म्हणून ओरडले. मला क्षणभर काही कळेच ना. हा दिमित्री असा अचानक असा समोर येऊन उभा ठाकलेला. मग मी कालिंदी का? का असाच विचार करायचं काही कारण नाही? कारण मग आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडायला हवं. ते तर केवळ अशक्य. एक वेळ त्यानी माझी जागा बळकावल्याबद्द्ल अम्ही भांडू मात्र शकलो असतो. आता माझं त्याच्याकडे लक्ष होतं. मी त्याच्याकडे बघत होते.

त्यानं मिलिटरी ग्रीन कलरचा टीशर्ट घातला होता. खाली फ़िकट ब्राऊन कलरची क्वाड्रा होती. त्याचा हेअरकट सांगायचा झाला तर थेट "बिफ़ोर सनराईज" मधल्या हिरोसारखा. दाढी मात्र एकदम मन लावून केल्यासारखी वाटत होती. हातात घड्याळ वगैरे काही नाही. एव्हाना सिगारेट संपून त्या जागी ब्रेडचा तुकडा आला होता. त्याच्या पायात ग्रे आणि बलॅक कॉम्बिनेशनचे फ़्लोटर्स होते. आणखी एका गोष्टीकडे माझा लक्ष गेलं. मघापासून तो त्याचा डावा पाय़ सतत हलवत होता. फ़क्त सिगारेट पितांनाच तो स्थिर होता. तेवढ्यात त्यानं हालचाल केली. खुर्चीवर जरा सरकून बसला, सिगारेट शिलगावली, आणि उजव्या हातात धरली. पाय हलाय़चा थांबला आणि डाव्या हातात पेन आलं. म्हणजे तो डावरा होता. त्याच्या हातावर विरळ केस होते. आत्ता त्यांच्यावर ऊन पडल्यानं ते चमकत होते. त्याचा रंग तसा सावळाच, पण ओरिजिनली नाही, तर रापलेला लालसर सावळा वाटत होता. मग प्रथमच माझं लक्ष त्याच्या चेह्र्‍याकडे गेलं. कपाळ सपाट पण खालच्या सरळ टोकदार नाकाला शोभणारं. नाकाचं टोक जाणवेलसं स्पष्ट तरीही बेढब नव्हतं. त्या नाकाचा बाक खूप प्रमाणात होता. परत एकदा मला दिमित्रीच आठवला. आत्ता त्याच्या कपाळावर अणि डोळ्यांच्या कडांना थोड्याशा सुरकुत्या होत्या. त्यानं जिवणीची हालचाल केली की चेहर्‍यावरही त्या उमटत होत्या. ओठ अगदी पातळ. खाली हनुवटी कपाळाशी तोल साधणारी पण नाकाचा डौल जाणार नाही अशा बेतानं. ह्या सुरकुत्या तर दिमित्रीच्या. त्याचं डोकं किंचित उजव्या बाजूला वळलं. आणि मला त्याच्या हनुवटीतली ती जीवघेणी खळी दिसली. परत एकदा दिमित्री.

त्यानं पुन्हा एकदा हालचाल केली अणि माझी तंद्री एकदम भंग पावली. मला अचानक अशी जाणीव झाली कि हे सगळं चित्र आता भंग पावणार. मला आलेल्या तरल गुंगीची जागा आता डोक्याला आलेल्या जडपणानं घेतली. भयंकर हेल्पलेस वाटलं. अंगातलं सगळं त्राण गेल्यासारखं वाटलं. मला त्याचा, दिमित्रीचा, स्वत:चा, सगळ्यांचाच राग यायला लागला. घशात एकदम कोरडं वाटलं.

एव्हाना चहा संपला होता. परत एकदा ऑर्डर करावा का? कसलाच उत्साह शिल्ल्क नव्हता. पण चहा पिणं मस्ट होतं. मग शेवटी मागवलाच. त्याच्याकडे नजर गेली. तो शांतपणे लिहीत होता. सिगरेट संपली तरी दोन बोटं तशीच राहिली होती, सिगारेट धरल्यासारखी. त्याला आजूबाजूला चाललेल्या गोष्टींची कल्पनाही नव्हती.

माझा दिमित्री अजूनही माझ्यातच होता. थॅंक गॉड!